नंदुरबार: देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाल मिरची खरेदीला सुरुवात झाली असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक होत असून दसऱ्यानंतर आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती लाल मिरचीची खरेदी सुरू झाली असून मिरचीला प्रतवारीनुसार 4000 पासून तर 5000 हजार रुपयांचा दर मिळत आहे. यावर्षी हंगाम चांगला असणार असून मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खरीप हंगामात मिरचीसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण असल्याने मिरची उत्पन्नात वाढ होणार आहे. तर लाल मिरचीला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मिरची लाल करण्यावर भर दिला आहे. परतीच्या पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे बाहेरील व्यापारी दसऱ्यानंतरच मिरची खरेदी करण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यावर्षी मिरचीला चांगला भाव मिळत आहे. मात्र आवक वाढल्यानंतर भाव कमी जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यापारी मिरची खरेदी करून पथार्यांवर वाळण्यासाठी टाकत असतात. मात्र शहराचा वाढता विस्तार आणि ज्या ठिकाणी मिरची वाळवली जाते, तिथे प्लॉट पडल्याने व्यापाऱ्यांना या वर्षी जागेची समस्या निर्माण होऊ शकते. सरकारने मिरची व्यापाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
गुंटूरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मिरची उत्पादक जिल्ह्यात चिली पार्कला राज्य सरकार का चाल ढकल करत आहे हा मोठा प्रश्न आहे.