Marigold Flower Prices: सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात बाजारात फुलांना मोठी मागणी असते. श्रावणात चढ्या भावाने झेंडूची फुले विकली जातात. परंतु यंदाच्या वर्षी पावसाने झेंडूच्या फुलांची प्रत खलावली आहे. श्रावणात उच्च प्रतीच्या फुलला 50 ते 80 रुपये किलो दर मिळतो. परंतु यंदाच्या वर्षी पावसाने फुलांची क्वालिटी खलावली आणि सध्या झेंडूच्या फुलाला 20 ते 30 रुपये किलो दर आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव येथील राहुल पवार यांनी 3 एकरावर झेंडूची लागवड केली आहे. झेंडूचे दर घसरल्याने पवार चिंता व्यक्त करत आहेत.
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी राहुल पवार यांनी झेंडूची बाग आहे. बागेत चांगली फुले बहरत आहेत. पंरतु असं असून देखील ते चिंतेत आहेत. त्याचं कारण म्हणजे फुलाला दर नाहीये. श्रावण महिन्यात फुलांना चांगला दर मिळतो. परंतु यंदाच्या वर्षी श्रावण असून देखील फुलाला दर मिळाला नाही.
याबाबत बोलताना शेतकरी राहुल पवार म्हणाले, दरवर्षी चांगला दर असतो. यंदाच्या वर्षी पाऊस जास्त असल्याने फुलात पाणी जात आणि फुलाला बुरुषी लागते, फुलं काळे पडते आणि खराब होतं. श्रावणात फुलांना मागणी जास्त असते. दर वर्षी श्रावण महिन्यात झेंडूच्या फुलांना 40 ते 80 रुपये दर असतो. पंरतु यंदाच्या वर्षी उच्च प्रतीच्या मालाला अवघा 20 ते 30 रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
जर आगामी काळात पाऊस कमी झाला नाही तर नुकसानीला सामोरं जावं लागेल, असं राहुल पवार म्हणाले. राहुल पवार यांच्याकडे स्वतःची 6 एकर शेती आहे. तर 10 एकर भाडे तत्वावर शेती करण्यास घेतली आहे. त्यातील 3 एकरावर कलकत्ता स्टंप या झेंडूच्या वाणाची लागवड केली आहे. राहुल पवार यांना आतापर्यंत 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला आहे. तर अजून पीक निघेपर्यंत 40 ते 50 हजार त्यांना खर्च येणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे 2 वर्ष पिकाचे नुकसान झाले यंदाच्या वर्षी वाटलं होतं, चांगले पैसे मिळतील पण यंदाच्या वर्षी नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. दौंड तालुक्यातील यवत, खुटबाव, भांडगाव या भागात फुलांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पंरतु यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांची अवस्था ही राहुल पवार यांच्यासारखीच आहे. राहुल पवार यांच्यासारखे झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राहुल पवार यांचे पीक जोमात आहे, उत्पादन चांगलं आहे. फक्त मालाला दर नाहीये. त्याचं कारण सतत येणारा पाऊस. पावसाने थोडीशी उघडीप द्यावी, ज्याने करून होणारे नुकसान टळेल, अशी आशा राहुल पवार करीत आहेत.