Maharashtra Sindhudurg News : कोकणातील हापुसला निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस, उष्मा आणि आता फळमाशी यामुळे हापुस उत्पादक शेतकरी, बागायतदार अडचणीत सापडले आहेत. सतत बदलत असलेल्या वातावरणाच्या कचाट्यात सापडलेल्या आंबा पिकाला यावर्षी फळमाशीनं चांगलाच फटका दिला आहे. आंबा उत्पादक शेतकरी या माशीच्या वाढत्या संक्रमणासमोर यावर्षी हतबल होऊन हात टेकले आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात सुमारे 60 टक्के आंबा (Alphanso Mangos) फळमाशीनं बाधित झाला आहे.


हापुस (Alphanso) आंब्यावर यावर्षी फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव आहे. आंबा बागेत फळमाशीनं प्रवेश केला की, आंब्याच्या फळांवर फळमाशी छिद्रं काढते. त्यामुळे फळ पूर्णपणे वाया जातं. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नसल्याचा आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. फळमाशी झाडावर आंबा कच्चा असताना बसून आपल्या नांगीनं आंब्याच्या वरच्या हिरव्या आवरणात बारीकसे छिद्र पाडून त्यात अंडी सोडते. हे छिद्र वरून डोळ्यांनी पाहिलं तरी दिसत नाही. आंबा उतरवून तो पिकायला ठेवल्यानंतर पिकल्यावर एक काळा डाग दिसू लागतो. आणि त्यातून आळी बाहेर पडते. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.


फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ट्रॅप लावला जातो. ज्यात मुख्यतः नर अडकतो आणि मरतो. जास्तीत जास्त फळमाशीचा नर मारुन आपोआप फळमाशीच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिबंध यावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी हा प्रयोग सगळ्याचं शेतकऱ्यांनी करायला हवा. एका बागेत केला आणि बाजूच्या आंबा बागेत हे ट्रॅप लावले नाही तर काहीही उपयोग होत नाही. कारण बाजूच्या आंबा बागेतील नर-मादी एकत्र येऊन त्यातली फळमाशी ट्रॅप लावलेल्या बागेत येते आणि ती या ट्रॅपमध्ये अडकत नाही. फळमाशांच्या समस्येमुळे आंब्याच्या उत्पादनात खूप मोठा परिणाम झाला आहे.


आंबा बागायतदारांना फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आडीत पिकवण्यासाठी ठेवलेले बहुतांशी आंबे फेकूनच द्यावे लागले. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे अनेक आंब्यांना डाग पडतात. यावर्षी अवकाळी पावसानं आंबा उत्पादकांचं कंबरडं मोडलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेमध्ये आणि देवगडमध्ये आंबा संशोधन केंद्रं आहेत. मात्र या फळमाशीवर कोणत्याही प्रकारचं संशोधन किंवा उपाययोजना झालेल्या नाहीत. आता तरी विद्यापीठानं संशोधन करून या फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. 


आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून राहिलेला आंबा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात आंब्याचं वाढलेलं प्रमाण, उष्मा आणि फळमाशीमुळे आंब्याचं झालेलं नुकसान, दरांत झालेली घसरण अशा स्थितीमुळे हवालदिल झाले आहेत. हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यानं हापूस आंब्याची झालेली वाताहत, आंब्याचे गडगडलेले दर यामुळे शेवटच्या टप्प्यात मुबलक आंबा असूनही बागायतदारांचं नुकसान झालं आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळं धोक्यात आलेला आंबा शेवटी कॅनिंगला द्यावा लागला.