Quad Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 22 मे रोजी रात्री जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 23 आणि 24 मे रोजी जपानची राजधानी टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या दौऱ्यात मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. सुमारे 36 तासांच्या या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान  स्कॉट मॉरिसन यांनाही ते भेटणार आहेत.


पंतप्रधान मोदींच्या या तिसर्‍या जपान दौऱ्यात, महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर द्विपक्षीय चर्चेदरम्यान गुंतवणूक, व्यापार, सुरक्षा, तंत्रज्ञान यासह अनेक मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी 22 मेच्या रात्री जपानला रवाना होतील आणि 23 मे रोजी टोकियोला पोहोचताच त्यांचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. क्वाडच्या भविष्यासाठी आणि त्याच्या परिणामकारकतेसाठी टोकियो बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देश आर्थिक आणि सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देत आहेत. अशा स्थितीत अमेरिका-जपान-भारत आणि ऑस्ट्रेलियाचे नेते ठोस परिणाम देणाऱ्या योजना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही क्वाड नेत्यांची चौथी बैठक असून पहिली बैठक गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आभासी पद्धतीनं झाली होती. 


जागतिक प्रश्नांविषयी चर्चा करण्याची संधी : अरिंदम बाग


हिंद प्रशांत क्षेत्रातल्या घडामोडींविषयी तसंच परस्पर हिताच्या जागतिक प्रश्नांविषयी चर्चा करण्याची संधी या परिषदेमुळे मिळणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं . क्वाड पुढाकारानं सुरु झालेल्या योजनांचा आढावा हे नेते घेतील तसंच साह्चर्याची नवी क्षेत्र हुडकून आगामी काळासाठी व्हिजन आणि धोरणात्मक मार्गदर्शन ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.


मोदी-जो बिडेन यांच्यात चर्चा होणार
 
पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. ही त्यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दुसरी वन-टू-वन बैठक टोकियो येथे होणार आहे. याआधी दोन्ही नेत्यांची सप्टेंबर 2021 मध्ये वॉशिंग्टन येथे क्वाडच्या याच बैठकीदरम्यान भेट झाली होती. मात्र, अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात दोन्ही नेत्यांमध्ये अनेक फोन कॉल्स, आभासी संभाषण झाले. तसेच दुसरीकडे ते दोन महिन्यात दुसऱ्यांदा जपानचे पंतप्रधान किशिदा यांची भेट घेणार आहेत. याशिवाय पीएम मोदी जपानमध्ये जपानी उद्योगपतींना देखील भेटणार असून भारतीय समुदायाला संबोधितही करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम 23 मे रोजी होणार आहेत तर 24 मे रोजी क्वाड नेत्यांची शिखर परिषद होणार आहे. क्वाड नेत्यांच्या शिखर बैठकीत मागील बैठकीच्या निर्णयांचा आढावा घेतला जाईल. त्याचवेळी, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांसोबत परस्पर भागीदारी आणि भागीदारीचे फॅब्रिक मजबूत करण्यासाठी योजना पुढे नेली जाईल.


युक्रेन-रशिया युद्ध संकटावरही चर्चा होणार


टोकियोमध्ये होणाऱ्या बैठकीत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. या मुद्द्यावरुन जिथे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने उघडपणे रशियाला विरोध केला आहे, त्याचबरोबर युद्धविरामानंतर शांततापूर्ण संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढला जावा यावर भारत सातत्याने भर देत आहे. मात्र, भारताने द्विपक्षीय पातळीवरही सर्व क्वाड सदस्य देशांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा स्थितीत भारताच्या भूमिकेत कोणताही मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशिया-युक्रेन युद्धात मोदी आणि बिडेन यांच्यातील ही पहिलीच भेट असेल. अमेरिका सध्या उघडपणे युक्रेनच्या पाठीशी उभी आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा भर द्विपक्षीय सहकार्य आणि इंडो-पॅसिफिकसाठीच्या रणनीतीमध्ये परस्पर भागीदारीवर अधिक असेल, असे संकेत मिळत आहेत.