Maharashtra News : राज्यातील महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company) नेहमीच या ना त्या भलत्याच कारणानं चर्चेत असतं. आता या महावितरण (Maharashtra State Electricity) कंपनीचा एक नवा उपक्रम समोर आला आहे. हिंगोलीतील (Hingoli) सेनगाव येथील शेतकरी कुंडलिक तिडके यांनी 2004 मध्ये वीज जोडणीची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कुंडलिक तिडके यांना वीज (Electricity) जोडणी मिळाली नाही. परंतु 1 लाख 11 हजाराचे बिल यांच्या नावानं देण्यात आलं आहे.  


हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील रहिवाशी असलेले कुंडलिक तिडके यांना एक हेक्टर शेत जमीन आहे. ही शेतजमीन सेनगावच्या शेतशिवारात आहे. ही शेती ओलिताखाली आणण्यासाठी कुंडलिक तिडके यांनी आपल्या शेतामध्ये एक बोरवेल घेऊन शेती मधून चांगल्या पद्धतीनं उत्पादन घ्यायचं ठरवलं. 


शेतामध्ये बोरवेल घेतला खरा, पण या शेतीला पाणी देण्यासाठी विजेचीही तितकीच गरज आहे. हे लक्षात घेता 2014 साली तिडके यांनी महावितरणचे कोटेशन भरून वीज जोडणीची मागणी केली. आपल्या शेतात लवकरच वीज जोडणी केली जाईल आणि आपली संपूर्ण शेती आता ओलिताखाली येणार असं स्वप्न पाहणारे कुंडलिक तिडके गेल्या आठ वर्षांपासून महावितरणच्या वीज जोडणीची वाट पाहत आहेत. या आठ वर्षांत महावितरणने कुंडलिक तिडके यांच्या शेतात वीजजोडणी दिलीच नाही. परंतु कुंडलिक तिडके यांना एक लाख अकरा हजार रुपयाचा वीज बिल महावितरणच्या वतीनं देण्यात आला आहे. जी वीज आपण वापरलीच नाही, आपल्या शेतात वीज जोडणी महावितरणने दिलीच नाही, मग एक लाख अकरा हजार रुपये वीज बिल भरायचं कशाचं? आसा प्रश्न कुंडलिक तिडके यांना पडला आहे. 


महावितरणच्या नव्या उपक्रमामुळे महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. अशाच पद्धतीनं जिल्ह्यात अनेक वीज ग्राहकांना महावितरणच्या वतीनं वाढीव बिलं दिली जातात. असे प्रकार करुन वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा काम ही महावितरण कंपनी करत आहे. 


ऑनलाईन आणि ऑफलाईन बिलात मोठी तफावत 


सेनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुंडलिक तिडके यांना वीजजोडणी न घेताच 64 हजार हजार रुपयांच्या वीज बिलाची पावती महावितरणच्या वतीनं देण्यात आली आहे. परंतु हे वीजबिल भरण्यासाठी गेले असता तिडके यांच्या नावावर वीज वितरण कंपनीचे एक लाख अकरा हजार रुपये इतके बिल बाकी असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.