नवी मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षी आंबा उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना खूप मोठा फटका बसला होता. आता मात्र, कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे स्थिती पूर्वपदावर येत आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आवक कमी झाल्याने आंब्याचे दर हे सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर होते. एपीएमसी मार्केटमध्ये 90 हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाल्याने भाव कोसळले आहेत. जवळपास एक हजार रूपये डझन मिळणारा आंबा आता 200 ते 500 रूपयांवर आला आहे.हापूस आंब्याची किंमत कमी झाल्याने खवय्यांसाठी हा मोठा दिलासा असून स्वस्तात आंबे विकत घेता येणार आहेत.
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली आहे. दिवसाला जवळपास 90 हजार पेट्यांची आवक होऊ लागल्याने हापूस आंब्यांचे दर निम्म्यावर आले आहेत.कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा येऊ लागला आहे. आवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्यावर परिणाम झाल्याने आवक घटली होती.त्यामुळे डझनाला हापूस आंब्याचे भाव एक हजारांच्यावर गेले होते.मात्र आता तेच भाव 200 ते 500 रूपये डझनावर आले आहेत. हापूस आंब्या बरोबर पायरी, केसर, बदामी, लालबाग, मलीका या आंब्यांचीही कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधून आवक झाली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये आंबा स्वस्त झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर सर्वसामान्य ग्राहकांनीही गर्दी केली आहे. हापूस आंब्याबरोबर इतर जातींच्या आंब्यांचे दरही निम्म्यावर आले आहेत. त्यातच हापूस आंब्याचा सीझन पुढील 15 दिवसच चालणार असल्याने खवय्यांची एपीएमसीत गर्दी वाढली आहे.
एपीएमसीमधील आंब्यांचे दर -
- हापूस आंबा - 200 ते 500 रूपये डझन
- तोतापुरी - 40-45 रुपये किलो
- मलिका - 60 रुपये किलो
- लालबाग- 60 रुपये किलो
- बदामी - 70 रुपये किलो
- केसर - 150 रुपये किलो
- पायरी - 150 -450 रुपये डझन
संबंधित बातम्या :
Andhra Pradesh Mango : आंब्यांच्या मागणीत 60 टक्क्यांची वाढ, राजस्थान, गुजरात, दिल्लीसह यूपीमध्ये निर्यात, विजयवाडातील व्यापाऱ्यांची माहिती