Kharif crop News : राज्यात आत्तापर्यंत 96 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या (kharif crop Sowing) पूर्ण झाल्या आहे. राज्यात सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाते. आत्तापर्यंत 137 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीच याच कालावधीत 140 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र थोड्या प्रमाणात घटलं आहे. दरम्यान, पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.
पुणे विभाग पेरणीत आघाडीवर
दरम्यान, यावर्षी खरीपातील मुख्य पिकांची पेरणी समाधानकारक झाली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात या पिकांच्या पेरण्या बऱ्यापैकी झाल्या आहेत. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात 99 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर कोकण विभागात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 97 टक्के झाल्या आहेत. नाशिक 97 टक्के, छत्रपती संभाजीनगर 97 टक्के, लातूरमध्ये 100 टक्के, अमरावती आणि नागपूर विभागात 99 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोल्हापूर विभागात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यात कमी पेरण्या झाल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात पावसाची दडी, खरीपाची पीकं धोक्यात
सध्या राज्यात पावसानं दडी मारली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. कमी पावसामुळं राज्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रीय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 89 टक्के पाऊस यंदा झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात आलेला आहे. तर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणी साठा देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं चिंता वाढलेली आहे.
आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे. त्यामुळं आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात येलो अलर्ट दिला होता. मात्र, बदलती परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याची स्थिती आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मात्रस सध्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. आत्तापर्यंत काही जिल्हे सोडले तर बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: