Raju Shetti : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येऊन महिना होऊन गेला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाहीत. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava) यांची भेट घेतली. फेब्रुवारीअखेर अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर मार्चअखेरीस हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे.


Raju Shetti : प्रोत्साहनपर अनुदान नेमकं कधी मिळणार  


प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे आज-उद्या जमा होतील, या आशेने शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत. मात्र, शेतकरी आता थकला आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान नेमकं कधी मिळणार याबाबत राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यातून शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या घोषणेनंतरही तब्बल एक महिन्याने पहिली यादी आली. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणीकरण केले, त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाईलवर आला, पण प्रत्यक्ष रक्कमच अजून खात्यावर जमा झालेली नसल्याचे राजू शेट्टींनी म्हटलं आहे.


मार्च अखेरपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता


शासनाच्या नियमानुसार ज्या दिवशी आधार प्रमाणिकरण होईल त्याच दिवशी ही रक्कम जमा होणार होती. म्हणून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत. पण शासनाकडून निधीच न आल्याने ही रक्कम जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत मुख्य सचिवांनी राज्याचे सहकार सचिव आण वित्त सचिव यांना ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे, अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांचे अनुदान येत्या आठवड्याभरात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हे अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत आदेश दिले आहेत. सध्या तिसऱ्या यादीतील अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडे असून फेब्रुवारीअखेर ही मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करुन पुरवणी मागणीतून मार्च अखेरपर्यंत सर्व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना अजून दोन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : तातडीने ऊस दर नियंत्रण मंडळाची स्थापना करा; राजू शेट्टी यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी