Banana Farming : केळी पिकाला (Banana crop) प्रती किलो 18.90 रुपयांंचा हमीभाव मिळावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली आहे. केळीला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळण्यासाठी  केळी उत्पादक शेतकरी संघाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. या संदर्भात संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली. 


महाराष्ट्रात केली पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. या पिकाचे महाराष्ट्रात अंदाजे 90 हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, आजपर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा हमीभाव मिळालेला नाही. त्यामुळं केळीची कमी दराने विक्री होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, त्यामुळं केळीला हमीभाव मिळणे गरजेचं असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली.



 


नेमक्या काय आहेत मागण्या



  • पुण्यात केळी संशोधन केंद्र स्थापन करावे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

  • केळी टिशू कल्चर ऊती संवर्धन कंपन्यांची रोपे विकण्याअगोदर त्याची प्रत्येक तालुक्यात लागवड करुन  शेतकऱ्यांना माहिती द्यावी. तसेच त्यांनी केळीची रोपे विकण्यास परवानगी द्यावी. रोपांची काळजी कशी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन देण्यात यावे

  • खतांच्या आणि औषधांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रोडक्शन कॉस्टपेक्षा जास्त दरानं खतांची विक्री केली जाते.  ते दर कमी करावेत अशी मागणी देखील यावे अशी मागणी देखील केळी उत्पादक शेतकरी संघानं केली आहे.

  • केळी संशोधन केंद्रामध्ये केळीपासून इतर प्रोडक्ट तयार करता येतात. त्यामध्ये जाम, जेली, चिप्स, केळी पावडर, धागा तयार करणं, कंपोस्ट खत असे अनेक उद्योगधंदे तयार झाले तर शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल.

  • केळी संशोधन केंद्रामध्ये शासनाकडून जिल्हानिहाय शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.


या प्रमुख मागण्या केळी उत्पादक शेतकरी संघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. या सर्व मागण्यांचे निवदेन देखील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिल्याची माहिती किरण चव्हाण यांनी सांगितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर केळी उत्पादक शेतकरी संघाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव, तज्ञ संचालक रवी डिगे, शंभू सेनाप्रमुख अतुल माने पाटील उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या: