लातूर : एडीएम अॅग्रोच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ असल्याचं समोर आलं. एका क्विंटलमागे 12 ते 14 किलोंचा फरक असल्याचं लक्षात आल्यानंतर एका शेतकऱ्याने तशी तक्रार केली. घडलेल्या प्रकारानंतर शेतकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली एडीएम अॅग्रो या कंपनीचे ठिकठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. लातूर एमआयडीसी येथे त्यांचा प्लांट आहे. लातूर जिल्ह्यातील निटूर येथे कंपनीचं सोयाबीन खरेदी केंद्र आहे. नेताजी सोमवंशी या शेतकऱ्यांना येथे सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. सोयाबीनचा काटा केल्यानंतर शेतकऱ्याला यात शंका निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा सोयाबीनचा काटा करण्यात आला. त्यात तफावत आढळून आली. तेथे हजर असणाऱ्या शेतकऱ्यांनी मग याची तक्रार संबंधित विभागाकडे केली.


वैधमापन शास्त्र विभाग औसा येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आल्यानंतर एटीएम अॅग्रो च्या खरेदी केंद्रावरील वजन काट्याची तपासणी केली. या तपासणीत वजन काट्यात दोष असल्याचं आढळून आलं आहे. पुढील कारवाई संबंधित विभागातील अधिकारी करत आहेत. कंपनीच्या या खरेदी केंद्रावरील व्यवहार थांबवण्यात आले आहेत. कंपनीच्या जिल्ह्यातील इतरही खरेदी केंद्राची तपासणी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. या तपासणीचा संपूर्ण अहवाल जिल्ह्यातील कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर यावरील पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त होणार आहेत.


एका क्विंटल मागे बारा ते चौदा किलोचा फरक पडत असल्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाला आहे. मागील अनेक वर्षापासून हे खरेदी केंद्र येथे कार्यरत आहे. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. साल 2008 पासून हे खरेदी केंद्र येथे अस्तित्वात आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.


मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी या ठिकाणीच सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत असतात. कंपनीचा खरेदी केंद्र आहे अद्ययावत काट्यावर माप केलं जातं. यामुळे इथे कोणताही दगा फटका शेतकऱ्यांना होणार नाही हा विश्वास होता. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्यामध्येच घोळ केल्याने कंपनीवरचा विश्वास उडून गेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी तुळशीदास साळुंखे यांनी दिली आहे.


2008 पासून आजतागायत खरेदी केंद्र येथे चालू आहे. शेतकऱ्यांना क्विंटल मागे 12 ते 14 किलोंना फसवणारा हे खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्यात यावा. शेतकऱ्यांना आतापर्यंत लुटलेली पैसे कंपनीने परत करावे, नुकसान भरून दिले नाही तर जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद पाडू असा इशारा या वेळेस विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.


ही बातमी वाचा: