Raju Shetti : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विजेची टंचाई भासत आहे. राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोळशाची कमतरता आणि विजेची वाढलेली मागणी ही कारणे महावितरण आणि ऊर्जा खात्याने दिली आहेत. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारनियमनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असतानाच भारनियमन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी महावितरणसह, ऊर्जा खात्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. भारनियमन हे केवळ शेतकऱ्यांवर लावले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.
ऊर्जा खात्याचं अपयश
सध्या राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. जस जसे तापमान वाढत आहे, तस तशी राज्यात विजोची मागणी वाढत आहे. दरम्यान, हवामाना खात्याने सांगितले होते की, यावर्षीचा उन्हाळा कडक आहे. त्यामुळे कडक उन्हात विजेची मागणी वाढते. शेतकऱ्यांची मागणी देकील वाढते. तसेच घरघुती इतर कारणासाठी विजेची मागणी वाढते. याचे नियोन करणे ही महावितरणची जबाबदारी होती. मात्र महावितरण आणि महाजनको यांच्यात समन्वयचा अभाव राहिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. हे ऊर्जा खात्याचे अपयश आहे. त्यांनी विजेचे नियोजन केले नाही. म्हणून आज चंटाई भासत आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांना जी 8 तासांची वीज मिळत होती, ती वीज आता तीन ते साडेतीन तास वीज मिळत आहे. त्यामुळं उभी पिकं डोळ्यादेखत करपू लागली आहेत. सातत्याने वीज जात-येत आहे, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. भारनियमन केवळ शेतकऱ्यांवर लावले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन खरेदीचे करार झाले असते तर ही वेळ आली नसती. खासगी क्षेत्रात मुबलक वीज आहे. पण खुल्या बाजारात 21 ते 22 रुपये युनिटने वीज खरेदी करुन खरेदीत पैसा खायचा असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विजेसाठी वनवन फिरावे लागत आहे. याची जबाबदारी, उर्जा खात्याची, महाजनकोची आणि महावितरणची असल्याचे शेट्टी म्हणाले.