Nanded farmers : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेती पिकांचेही या पावसामुळं नुकसान झालं आहे. दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. तब्बल 25 दिवसांची उघडीप दिल्यानंतर पाऊस होत आहे. 25 दिवस पाऊस नसल्यानं पिकं करपली होती. पिके करपल्यानंतर जोरदार पाऊस होत आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसामुळं पिकं अक्षरशः करपून गेली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर जरी वाढला असला तरी असला तरी याचा कोणताही उपयोग पिकांसाठी होणार नाही. सतत होत असणाऱ्या जोरदार पावसामुळं विष्णुपुरी धरण प्रकल्पाच्या वरील बाजूस येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले आहेत. यातून 57 हजार 350 क्यूसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान


नांदडे जिल्ह्यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. त्यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. उन्हामुळं ही पिकं वाळून गेली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीनं 80 टक्के पिके वाय गेली आहेत. तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत. त्यानंतर आता पावसानं हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती आणि फळ पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यात बाधितांना  एनडीआरएफच्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई ) भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.


आजही राज्यात पावसाचा अंदाज 


हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस  झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. पावसामुळं सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु होती. तसेच पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: