Tomato Price : सध्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्याठिकाणी एक किलो टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. दर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनपूर्व पावसामुळं टोमॅटोची काढणी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.
दरम्यान, जास्त उष्णतेमुळं उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा कमी टोमॅटोची आवक आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.
मार्चमध्ये कमी लागवडी
याबाबत एबीपी माझा डीजिटलने टोमॅटो उत्पादक शेतकरी शिवाजी आवटे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, टोमॅटोचे दर हे जून महिन्यात वाढण्याची शक्यता 15 फेब्रुवारीलाच वर्तवली होती. 2021 मधील जून ते ऑगस्ट हा काळ टोमॅटोसाठी फार मोठ्या मंदीचा कालावधी ठरला होता. तसेच यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचे आवटे म्हणाले. जून, जुलै हे टोमॅटोसाठी चांगल्या भावाची शक्यता असलेले महिने असतात असेही शिवाजी आवटे यांनी सांगितले. मार्च 2022 मध्ये देखील टोमॅटोच्या कमी लागवडी झाल्या आहेत. त्यातच टुटा CMV ची दहशत होती. एप्रिल पर्यंत टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण खूप कमी राहिले. मे महिन्यात जसे दर वाढले, तसे सर्वांची लागवडीसाठी धडपड सुरु झाली असे आवटे यांनी सांगितले.
थेट शेतकऱ्यांना फायदा
सध्या टोमॅटोच्या दराने शंभरीपार केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. टोमॅटो स्टोअर करता येत नाही. त्यामुळे त्याची लगेच विक्री करावी लागते. त्यामुळे व्यापारांना त्यामध्ये फार काही करता येत नाही. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे मार्च महिन्यात लागवडी कमी झाल्या. 10 टक्के सुद्धा लागवडी झाल्या नाहीत. तसेच उन्हाळ्यामध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवडी कमी केल्या परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये जर टोमॅटो लावले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार होता असा अंदाजी काही तज्ञ शेतकऱ्यांनी वर्तवला होता. ज्यांनी मार्चमध्ये लागवडी केल्या त्यांचा शेतमाल सध्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: