हिंगोली : वाढत्या तापमानाचा फटका हा दूध संकलनावर होत असून दूध उत्पादनात 15 ते 20 टक्के घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आला आहे. मराठवाड्यातील तापमानात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हिंगोलीचे तापमान सुद्धा 42°c पर्यंत पोहोचलं आहे. या तापमान वाढीचा फटका दूध संकलनावर झालेलं आहे आणि त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 


वाढत्या तापमानाचा फटका बसल्याने अनेक दुग्धजन्य जनावरे आजारी पडत आहेत त्यामुळे दूध उत्पादन कमी होत आहे. या तापमान वाढीमुळे जवळपास पंधरा ते वीस टक्के इतके दूध उत्पादन घटले आहे. हिंगोलीच्या बेलवाडीतील परमेश्वर मांडगे या शेतकऱ्याचा हा गोठा आहे. मांडगे यांच्याकडे जाफराबादी आणि मुरा जातीच्या 85 म्हैशी आहेत. एरवी मांडगे यांचे रोज  500 लिटर दूध उत्पादन होते. परंतु आता तापमानात वाढ झाल्यामुळे या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट 100 लिटरने झाली असून आता फक्त 400 लिटर इतकेच दूध मिळत आहे. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका परमेश्वर मांडगे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना बसतोय.  


एरवी सर्वसाधारण वातावरण असताना शेतकरी मांडगे यांना 500 लिटर दूध उत्पादन मिळत असते. साठ रुपये प्रति लिटर प्रमाणे या दुधापासून  शेतकऱ्याला तीस हजार रुपयांचे उत्पादन व्हायचं. परंतु आता दूध उत्पादनात 20 टक्क्यांनी घट झाल्याने हे उत्पादन फक्त 400 लिटरवर येऊन पोहोचला आहे. हे चारशे लिटर दूध साठ रुपये प्रमाणे विक्री केले असता शेतकरी मांडगे यांना फक्त दररोज 24 हजार रुपयांचे उत्पन्न मिळतंय.  


तापमान वाढीमुळे दूध उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी मांडगे यांना दररोज सहा हजार रुपयांचा आर्थिक फटका बसतोय. तापमान वाढीमुळे अनेक दुग्धजन्य जनावरे आजारी पडत आहेत. त्यामुळे आजारी पडलेल्या जनावरांचं दूध हे शंभर टक्क्यापर्यंत घटत आहे असे शेतकरी परमेश्वर मांडके हे सांगत आहेत.


तापमान वाढीमुळे दुधाच्या संकलनात होणारी ही घट कमी व्हावी आणि दूध उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी मांडगे यांनी या म्हशींना खास असा स्विमिंग पूल तयार केला आहे. तर गोठ्यामध्ये फॉगरच्या माध्यमातून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकरी परमेश्वर मांडगे करत आहेत. जनावरांची काळजी घ्यावी त्याचबरोबर वातावरणात होणाऱ्या बदलाप्रमाणे काळजी घेतल्यास या संकटापासून आपला बचाव करता येतो. त्याचबरोबर जनावरांची विशेष काळजी घ्यावी. जनावरे आजारी पडल्यास त्वरीत पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 


शेतकरी परमेश्वर मांडगे यांनी त्यांच्याकडे असलेल्या म्हैशीसाठी खास स्विमिंग पूल तयार केला आहे. त्या माध्यमातून म्हैशींच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.