Rajesh Tope : सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खते बी बियाणांची खरेदी करताना दिसत आहेत. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळं दुकानदारांनी शेतकऱ्यांना चांगले, दर्जेदार बियाणेच द्यावे असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. तसेच तुमच्या तात्पुरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका असेही टोपे म्हणाले.

Continues below advertisement

बियाणं खराब निघालं तर शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्ष वाया जातं

बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या काही बाबी आमच्या निदर्शनास आल्या असल्याचे टोपे म्हणाले. माझे सर्व दुकानदारांना विनंतीवजा आवाहन आहे, की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना योग्य कंपनीचेच बियाणे द्यावे. हा बळीराजा तुमच्यावर मोठा विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो. कोणत्याही तात्पुरत्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा विश्वास आपण तोडू नये, एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य असल्याचे टोपे यावेळी म्हणाले. या बियाण्यांच्या भरोशावर शेतकरी संपुर्ण वर्ष पिकांची वाट बघतात. मग बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते. याची परिणीती म्हणून नंतरचे दोन ते तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो. हाच कर्जबाजारी शेतकरी मग जीवनात काहीतरी टोकाचा निर्णय घेतो असे टोपे म्हणाले.

Continues below advertisement

बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू

माझी सर्व बियाणे दुकानदारांना पुन्हा एकदा विनंती आहे, शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणेच सुचवून खरेदी करण्याचा आग्रह करा. सर्व बियाणे दुकानदार हे सुद्धा एक शेतकरीच आहेत. बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू असेही राजेश टोपे म्हणाले. दरम्यान काही दुकानदारांकडून बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग देखील सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: