Agriculture Department Action : विक्रीचा अधिकृत परवाना नसलेले विविध नामांकित कंपन्यांचे कपाशी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले.  यवतमाळ तालुक्यातील वागदा येथे ही घटना घडली. याप्रकरणी कृषी अधिकाराऱ्यांच्या  फिर्यादीवरुन वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  नागपूरमधून कुरियरच्या माध्यमाने चारचाकी वाहनाने सदर माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहोचला होता. याची माहिती मिळताच कृषी विभागानं ही कारवाई केली आहे. 


दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन बुक करुन आपल्या पसंतीचे बियाणे, खते व कीटकनाशक औषधं बोलावली होती. नागपूर येथील एका गोडाऊनमधून कुरियरच्या माध्यमाने चारचाकी वाहनातून हा  माल वागदा गावात पोहोचला. बियाणे शेतकऱ्यांकडे पोहचण्या आधीच कृषी विभागाला याचा सुगवा लागला होता. त्यानंतर कृषी सहाय्यक सचिन वाघमारे यांनी मुद्देमाल कुरियर सेवेच्या दोन कर्मचाऱ्याकडून आपल्या ताब्यात घेऊन यासंबंधीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वागदा येथे पोहोचून पंचनामा केला.  


कृषी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल


विविध नामांकित कंपन्याचे सदर बियाणे, खते  आणि व औषधे विक्री करण्याचा अधिकृत परवाना नसल्यामुळे शहानिशा करुन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पांडुरंग फाळके यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  त्यावरुन वडगाव पोलिसांनी नागपूर येथील गोडाऊन किपर महेश बिभीषण पाटील याच्या विरुध्द कृषी कायद्या अंतर्गत विविध कलमा सह भादवी कलम 420 , 465 (फसवणूक व बनवाटिकरण) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वडगाव पोलिसांनी एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे एक वाहन व एक लाख 32 हजार 732 रुपयाचा माल असा एकूण दोन लाख 75 हजार 732 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार पवन राठोड हे करीत आहेत.


सध्या राज्यातील खरीप हंगाम तोंडावर आला आहे. सध्य स्थितीत शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात नगदी पीक असलेल्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. तसेच कपाशीची देखील लागवड केली जाते. या वर्षी खरिपाच्या हंगाम सुरु होण्याच्या अगोदर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आढळून आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे.