Farming Success: आजकाल उच्चशिक्षित तरुण तरुणी शेतीकडे वळताना दिसत असून वेगवेगळ्या प्रयोगातून पिकाची लागवड करत पारंपरिकतेच्या पुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न MBA  पूर्ण केलेल्या पूर्वानं केलाय आणि वर्षाला २५ लाख रुपयांची कमाई आता ही तरुणी करते. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या आणि फळे पिकवून पूर्वा साधारण इंजिनिअर किंवा कुठल्याही पदवीधराला मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक कमावतेय. विशेष म्हणजे राजस्थानच्या माळरानावर तिनं हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय.


सेंद्रीय शेतीतून लाखोंची कमाई


सध्या जगभरात ऑरगॅनिक शेतीकडे चांगला कल असून सेंद्रीय भाज्या, फळांना चांगली मागणी असते. या भाज्या फळांना दरही चांगला मिळतो. याचाच विचार करून करोना महामारीनंतर शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असून युट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयात संशोधन करत सेंद्रीय शेतीचा अभ्यास या तरुणीनं केलाय


राजस्थानच्या माळरानावर सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड.


राजस्थानच्या भलवाड्यापासून काही अंतरावर  हमीरगडची ही तरुणी असून पूर्वा जिंदल असं तिचं नाव आहे. कृषी जागरणनं दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या माळरानावर या मुलीनं १० एकर जमीन कसून मातीचा दर्जा सुधारून भाज्यांची लागवड केली आहे. १० एकर जमीनीला तीन भागात विभागून एका भागात कार्यालय गोठा सिंचन आणि पंप बसवून उर्वरित भागात शेती केली आहे.


सेंद्रीय भाज्यांना शेणखतासह सेंद्रीय खतही


सेंद्रीय भाज्यांना कोणत्याही रासायनीक फवारण्या पूर्वा करत नाही. शेणखतासह सेंद्रीय खतामुळं या भाज्यांना संपूर्ण राजस्थानमध्ये स्थानिक पातळीवर अधिक मागणी आहे. फळे, भाज्या यासोबत दुग्धव्यवसायातही पाऊल टाकले. गीर गायी पाळून त्यापासून तूप तयार करून विकण्याचा जोडधंदाही तिनं सुरु केल्यानं उत्पन्नाचा तिचा स्रोत वाढला आहे. कौटुंबिक व्यवसायापासून दूर जाऊन शेतीसारख्या अधिक कष्टाच्या व्यवसायात पाऊल टाकत आर्थिक प्रगती केली आहे.