Success Story: पुण्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यानं केवळ 50 गुंठ्यात कोथिंबीरीची लागवड करत लाखो रुपयांची कमाई केली आहे. ऑगस्टमध्ये २० किलो कोथिंबीर लावत सप्टेंबरच्या मध्यापर्यंत म्हणजे अवघ्या महिन्याभरात साडेआठ लाख रुपये कोथिंबिरीतून कमावले आहेत. शेतकऱ्यानं आणि व्यापाऱ्यानं कोथिंबीरीतून मिळालेल्या फायद्यानं  शेतातच गुलाल उधळून आंनंदोत्सव साजरा केलाय.


महाराष्ट्रातील शेतकरी आता आपल्या शिवारात नवे प्रयोग करण्यास इच्छूक असल्याचं दिसतं. पारंपरिक पिकांसह काही कॅश क्रॉपची लागवड करत अधिक फायदा कसा मिळेल याकडे शेतकऱ्यांचा भर असल्याचं दिसतं. टाकळी भीमा येथील प्रयोगशील शेतकऱ्यानंही असाच कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय.


तब्बल 8.5 लाख रुपयांची कमाई


बाळासाहेब करपे या शेतकऱ्यानं त्याच्या कुटुंबासह ऑगस्ट महिन्यात ५० गुंठ्यात धणा पेरला. पीक बहरल्यानंतर सद्गुरु व्हेजिटेबल कंपनीशी बोलून कोथिंबीरीचा भाव ठरवला. या कोथिंबीरीला चांगला भाव  मिळाला. ५० गुंठ्यातील कोथिंबीरीतून या शेतकऱ्यानं तब्बल साडेआठ लाख रुपयांची कमाई केली आहे. या पिकासाठी या शेतकऱ्याला एकूण ४० हजार रुपये खर्च आला.


15 हजार कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्या


पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्यानं महिनाभरात या शेतकऱ्याच्या शिवारात ५० गुंठ्यातून १५ हजार कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं. कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न निघणाऱ्या कोथिंबीरीतून या शेतकऱ्याला मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.


कसं केलं पिकाचं व्यवस्थापन?


टाकळी भीमा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब करपे यांनी बाजारातून अशोका जातीचं कोथिंबीरीचं बियाणं विकत आणलं.  स्प्रिंकलर पद्धतीनं पिकाला पाणी देत कोंबड खतही टाकलं. वेळोवेळी फवारण्या आणि पाणी दिल्यानं केवळ ५० गुंठ्यातून १५ हजार कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्या. कोथिंबीरीतून मिळालेल्या यशातून या शेतकऱ्यानं शिवारात गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.