K S Hosalikar on Monsoon news : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. यामुळं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मान्सूनच्या संदर्भातील माहितीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या शेतकरी बांधवांना हवामानाच्या अंदाजासंदर्भात विषेश मार्गदर्शनासाठी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार : कृष्णानंद होसाळीकर
पावसाच्या घडामोडीसंदर्भातील माहितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे. कृषी विभाग भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून शेतकरी बांधवांना प्रत्येक शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. प्रत्येक शुक्रवारी शेतकऱ्यांना साप्ताहिक हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे. तसेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील देण्यात येणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. याचा राज्यातील शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे होसाळीकर म्हणाले.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
दरम्यान, राज्याच्या विविध भागत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळं आयुक्तालयात 20 हून अधिक वाहन अडकली होती. झाड हटवायला बराच वेळ लागला, त्यानंतर वाहनं आयुक्तालयातून बाहेर पडली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं विविध ठिकाणी सुमारे 30 झाडपडीच्या घटनांची अग्निशमाक दलाकडे नोंद झाली आहे. तसेच नाशिक शहरात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस झाला
पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल
पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून रात्रीपासून ढगांच्या गडगडाटाह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वातावरणात असलेला उकाडा कमी झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून बळीराजाही सुखावला आहे.