Sadabhau Khot : सध्या राज्यात उसाला मिळाणाऱ्या एफआरपी (FRP) च्या मुद्यावरुन वादंग निर्माण झाले आहे. राज्य सरकरने शेतकऱ्यांना दोन टप्प्यात FRP देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना FRP एकरकमीच मिळाली पाहिजे, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने कवचकुंडलं आहेत, असे मत सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत मांडले.
राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यात देणेबाबतचा निर्णय घेऊन उस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP मिळालीच पाहिजे, हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती आजतागायत केंद्र सरकारने केलेली नाही. त्यासंदर्भातील पत्र देखील केंद्र सरकारकडून घेतले आहे. कोणतीही दुरुस्ती झालेले नसतानाही राज्य सरकारने FRP दोन टप्प्यात देण्याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.
मी सरकारला सांगू इच्छितो की एफआरपी एकरकमी मिळावी यासाठी शेतकऱ्यांना रक्त सांडले आहे. अनेक आंदोलन केली आहेत. अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. आज देखील आम्हाला न्यायालयाच्या तारखांना जावं लागत असते. तसेच दोन कारखान्यामधील 20 किलोमीटरचे हवाई अंतर देखील हे सरकार केव्हा काढणार आहे, हे देखील सांगावे असे खोत यावेळी म्हणाले. दोन टप्यात FRP देण्याचा निर्णय रद्द करून ती एकरकमी द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे. दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यावेळी सदाभाऊ खोत यांनी धारेवर धरले. तसेच यांसर्भात विविध शेतकरी संघटनांची एक बैठक घेण्याची विनंतीही केली. याबाबत सहकारमंत्र्यांनी पुढच्या आठवड्यात यावर बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: