Farmers Death : बीड जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. केज, गेवराई आणि आष्टी तालुक्यात या घटना घडल्या आहे. शेताकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळं  शेतीमधील मशागतीच्या कामाला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत आहेत. अशातच शेतीची कामं करताना दुर्दैवी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.


केज तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू


केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथील बाबूराव गणपतराव चंदनशिवे (वय,55) या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाबुराव चंदनशिवे हे सायंकाळच्या वेळी आपल्या शेतामध्ये विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा स्पर्श एका लोखंडी विद्युत पोलला झाला.त्यावेळी विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बाबुराव चंदनशिवे यांच्या भावाच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


गेवराई तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू 


गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरी येथे संजय बरगे हे शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्यानं विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. संजय बर्गे यांची एक व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून गेवराई शहरात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा त्यांचा परिवार आहे.


आष्टी तालुक्यात तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू


आष्टी तालुक्यातल्या शिरपूर येथे देखील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरपूर येथील श्रीकृष्ण जगताप हे आपल्या शेतात असलेली विदूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटरीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यानंर ते शेततळ्यात उतरले. एका दोरखंडाला पकडून शेततळ्याच्या वर येत असताना अचानक दोरखंड तुटून ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यानं पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.