Sindhudurg Farmers News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. अन्न व पाणीसाठा यामुळे तिलारीत विसावलेल्या रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू या बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत.


मे महिन्याच्या हंगामात फणस खाण्यासाठी कधी कधी रात्रीच्या वेळेस हे हत्ती अगदी घरालगत येत आहेत. हत्तीचा असा वावर वाढल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. तर कधी कधी भर रस्त्यावर हत्तींचा कळप नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांचा भीतीनं थरकाप उडत आहे. हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या उपाययोजना तकलादू पडल्या आहेत. आता तर हत्तीचा वावर लोकवस्तीत वाढू लागल्याने तिलारी खोऱ्यातील हत्तींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




गेल्या 20 ते 25 दिवसांपासून केर आणि मोर्ले या गावामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात फणसाचे उत्पादन घेतले जाते. फणसाचे उत्पादन असल्यान हत्ती या भागात येत आहेत. पाच हत्तींचा कळप या परिसरात वावरत असल्याची माहिती  नुकसानग्रस्त शेतकरी गोपाळ गवस यांनी दिली. या हत्तींमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  काजू गोळा करण्याचे काम देखील सध्या सुरु आहे. अशातच हत्ती येत असल्यामुळे शेतकरी बाहेर जाऊ शकत नाहीत. गेल्या काही दिवसात हत्तींना मोठ्या प्रमाणात फणसाच नुकसान केले आहे, त्यामुळे फणसाचे उत्पादन कमी झाले आहे.  तसेच नारळाची, केळीची बाग, बांबू याचेदेखील हत्तींनी मोठं नुकसान केलं आहे. शासन याठिकाणी कोणतेही लक्ष देत नसल्याचे गवस यांनी सांगतिले. नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मतद शासन करते. त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.