E-Peek Pahani: राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची (E-Peek Pahani) अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रद्द केली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण आता दूर होणार असल्याने बळीराजाला लवकर मदत होण्यास मदत होईल हे मात्र नक्की.


तलाठी, कृषी सहाय्यकांना प्रत्यक्ष पंचनामे करावे लागणार


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी केली होती. तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील. मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार


यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.


शेतकऱ्यांनी अॅपद्वारे पीक नोंदणी करावी


राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं. तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.


इतर महत्त्वाची बातमी


"इथे शेतकरी खचला असताना तुम्ही सत्कार स्वीकारता?" आमदार निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल