Vitthal Sugar Factory : पंढरपूर तालुक्याचे महत्वाचे आर्थिक चक्र अशी ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र, या सभेत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचा आक्षेप धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतला आहे. विठ्ठल कारखाना हा आर्थिक अडचणीत आल्यानं यावर्षी सुरु होऊ शकला नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे अध्यक्ष असला तरी मी चालू 4 साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे अभिजित पाटील यांनी यावेळी सुनावले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 46 वी ऑनलाईन सभा पार पडली. या सभेच्या संदर्भात अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या तनपुरे महाराज मठात प्रतिसभा घेत संचालक मंडळाला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके यांनी उत्तरे दिली नाहीत, अवघ्या काही वेळातच ही सभा अटोपती घेतल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईला आल्यानं शेतकऱ्यांची ऊस बिले, कर्मचाऱ्यांचे पगार, वाहतूकदारांची बिले असे कोट्यवधी रुपयांचे देणे कारखान्याला झाले आहे. यातच कारखान्यावर खूप मोठं कर्ज असल्यानं यंदा कारखाना देखील सुरु होऊ शकलेला नाही. यातच गेल्या दोन वर्षानंतर होत असलेली सभा ऑफलाईन घेण्याचा आग्रह सभासदांचा होता. मात्र, प्रशासनानं कोरोनाचं कारण देत ऑनलाईन सभा घेण्याचं सांगितले होते. दरम्यान, या सभेत सदासदांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले.
आपल्या प्रश्नांची उत्तरे देणं सोडाच उलट तुम्हाला यातले काय कळते असा प्रश्न विचारल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे अध्यक्ष असला तरी मी चालू 4 साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे अभिजित पाटील यांनी सुनावले. आता तुमच्यात हिम्मत असेल तर विठ्ठलाच्या संचालक मंडळांनी सभासदांच्या समोर येऊन आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केलं.आता सहकार विभागाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: