परळी वैद्यनाथ, बीड : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी म्हणजेच 21 ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 


याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहेत. एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे.


बुधवार पासून 25 ऑगस्ट पर्यंत असे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे आयोजन करण्यात आले असुन, परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. या महोत्सवाचे बुधवारी दुपारी 1 वाजता दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 


परळी वैद्यनाथ नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील व बीड जिल्ह्यातील मान्यवर आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 


21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार असून, कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. 


या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सवच, र्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, यांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांची दालने, भाजीपाला महोत्सव, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्री, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली असून भव्य वॉटरप्रूफ सभामंडप, चर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंग, भोजन आदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 


दरम्यान या कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे. 


बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.


दरम्यान बीड जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांसह शेतकरी बांधवांना अनेक प्रकारचे लाभदायक मार्गदर्शन मिळणार असून ही शेतकऱ्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे  तरी राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


संबंधित बातम्या : 


गुड न्यूज, सरकारचा लाडकी बहीणनंतर शेतकरी भावांसाठी मोठा निर्णय, नमो शेतकरी महासन्मानसाठी 2 हजार कोटी मंजूर, चौथा हप्ता लवकरच मिळणार