धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) सर्वच्या सर्व 57 मंडळाना अग्रीम पीक विमा (Crop Insurance) मिळणार असून याबाबतचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिले आहेत. विमा कंपनीने याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना दिले आहे. पूर्वी 40 मंडळाना अग्रीम विमा दिला जाणार होता. मात्र, आता वगळलेल्या उर्वरित 17 मंडळाना अशा सर्वच्या सर्व 57 मंडळाना मदत मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवत पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे.


धाराशिव जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत सुरुवात झाली असून उर्वरित मंडळाना सुद्धा दिवाळीपूर्वी लवकरच मदत देण्यात येणार आहे.


या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम विमा


धाराशिव जिल्ह्यातील 17 मंडळाना विमा नाकारला होता. मात्र,  आता मिळणार आहे त्यात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम, वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या मंडळांचा समावेश आहे.


57 कोटींचा अग्रीम विमा मिळणार 


40 महसूल मंडळातील 3 लाख 44 हजार 925 शेतकऱ्यांना 161 कोटी 81 लाख मिळणार होते त्यात आता भर पडली असुन 17 मंडळातील 1 लाख 53 हजार 795 शेतकऱ्यांना 57 कोटी अग्रीम विमा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील 4 लाख 98 हजार 720 शेतकऱ्यांना 218 कोटी 86 लाख मिळणार आहेत.


15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर 


एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.  


राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. जालना (Jalna), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), पुणे (Pune), नाशिक (Nashik), बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2023 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार 853 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला होता. त्यापैकी 5 लाख 60 हजार 468 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 406 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक संरक्षित केले होते. पावसाचा खंड, कीड व दुष्काळ असल्याने नुकसान भरपाईच्या 25 टक्के पीक पीक विमा मिळण्याची तरतूद असल्याने नुकसान भरपाई द्यावी याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी काढली होती.