CM Uddhav Thackeray : मला साखरेतील काही कळत नाही. प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो. मग त्यावर बाळासाहेब थोरात, अजितदादा, कधी राजेश टोपे मार्ग काढतात, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. शरद पवार यांचे अभिनंदन कारण त्यांनी साखरेचा गोडवा राजकारणात आणला आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वपक्षीय राजकारणी इथे एकत्र आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


मी अजून हळूहळू पावलं टाकतोय


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांनी प्रेमाने आणि आदराने या कार्यक्रमासाठी बोलावल होत. पण मी अजून हळूहळू पावलं टाकतोय असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


गडकरींचे भाषण एकूण वाटले की आपणही साखर कारखाना काढावा 


नितीन गडकरी इतके बोलले की मला वाटलं की मला आभार प्रदर्शन करावे लागेल. गडकरी साहेब आपण शहरी बाबू. शहरी माणसाचा साखरेशी संबंध हा चहात साखर किती घालू इतकाच असतो. मला साखरेतील काही कळत नाही. प्रश्न आला की डाव्या - उजव्या बाजूला बघतो असे ठाकरे यावेळी म्हणाले. गडकरींचे भाषण एकूण मला वाटले की आपणही साखर कारखाना काढावा. पण मी काढणार नाही. कारण गडकरींचेच वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करावा


साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. साखर महासंघाने या उद्योगातील अडचणी सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटीत करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्क आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. मात्र त्यांना नवे तंत्र आणि नियेाजन याबाबत मार्गदर्शन करावे लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्विकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. इथेनॉलकडे एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.