Chandrakant Patil : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवल्याशिवाय त्यांना शहराकडे जाण्यापासून रोखता येणार नाही. त्यादृष्टीनं प्रयत्न करताना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषीउद्योगांची भूमिका महत्वाची असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे (Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management Pune) इथं आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 'सूत्र 2022' परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.


सहकारी संस्थांना बळकट करावं लागणार


पारंपरिक शेतीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येणार नाही. त्यामुळं शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याला शासन प्रोत्साहन देत आहे. कृषी उद्योग ग्रामीण विकासासाठी महत्वाचे असल्यानं त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतमालाला बाजार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांना बळकट करावे लागेल. वैकुंठ मेहता  राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थानी या क्षेत्रात चांगले काम करणारे विद्यार्थी घडवले आहेत. सहकार विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमच्या फार कमी संस्था देशात आहेत. या क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व करण्याची क्षमता या संस्थेत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


वस्त्रोद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मुंबईत खरेदी-विक्री केंद्र सुरु करणार 


वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. राज्याला वस्त्रोद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योजकांच्या सूचनेनुसार लवकरच मुंबईत खरेदी-विक्री केंद्र सुरु करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला वैकुंठ मेहता  राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थाचे संचालक पार्थ राय, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष रामगिरे, डॉ. हेमा यादव, डॉ. डी. रवी, अनिल तिवारी उपस्थित होते.


लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलली


पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीनं 100 टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा आजार  नियंत्रणात येत असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. जिल्ह्यात पशुधनातील लंपी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच तातडीने 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लंपी संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तात्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लंपीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे पाच चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतल्याचे पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी; ऊस परिषदेतून राजू शेट्टींची मागणी