Buldana News : शेतकरी प्रश्नांच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्यासाठी विद्युत रोहित्रे मंजूर झाली होती. त्याच्या वर्क ऑर्डरही निघाल्या होत्या. तरी अद्याप ठेकेदारांकडून कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वात बुलढाणा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जवळपास चार तास हे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात 8 दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता जायभाये यांनी दिले. त्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. 


शेतकऱ्यांसाठी विद्युत रोहित्रे मंजूर झाली आहेत. तसेच त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध झाला असून, मे महिन्यात रोहित्रांच्या कामांच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होतं. परंतू आज पावसाळा सुरु झाला तरी काही ठेकेदारांनी कामे सुरुही केली नाहीत. ही प्रलंबित कामे आता पूर्ण करताना पिकांचे मोठं नुकसान होणार आहे. तरी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई देऊन महावितरणने ही कामे तत्काळ पुर्ण करावीत, यासाठी शेलोडी (ता.चिखली) सह इतर गावातील शेतकऱ्यांना घेऊन  महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. 




दरम्यान, सर्व आंदोलक मुक्कामाच्या तयारीनेच गेले होते. मात्र, आमची तयारी पाहून 4 तासात प्रशासन हादरले. 8 दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन बुलढाणा महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता जायभाये यांनी दिल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. त्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर महावितरणने दिलेले आश्वासन पाळले नसते तर महावितरणला आक्रमक आंदोलनाला सामोरं जावं लागेल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.


महत्वाच्या बातम्या: