Unseasonal Rain in Hingoli : हिंगोली जिल्ह्यात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारपीटीमुळे  फळबागांना मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जुनुना गावातील शेतकरी प्रल्हाद जाधव यांच्या सहा एकर शेतातील डाळिंबाच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंबाची अनेक झाडे मोडली असून, फळांचेही मोठे नुकसान झाले. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


बुधुवारी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील जुनुना येथील रहिवासी असलेले शेतकरी प्रल्हाद जाधव यांच्याकडे सहा एकरवर डाळिंबाची बाग आहे. फळबागेची  तीन वर्षापूर्वी लागवड केली आहे. आता डाळिंब तयार झाली होती. अशातच काल झालेली गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 




शेतकरी प्रल्हाद जाधव यांनी सहा एकर शेत जमिनीवर डाळिंबाची बाग लहानाची मोठी करण्यासाठी आतापर्यंत सात लाख रुपये  खर्च केला आहे. यावर्षी निघणाऱ्या उत्पन्नातून जाधव यांना चांगला मोबदला मिळणार असल्याची अपेक्षा होती. परंतू काल झालेल्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांचा मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंबाची फळे फुटली आहेत. तर काही फळांना मार लागला आहे. त्याचबरोबर बागेतील अनेक डाळिंबाची झाडे मोडून पडली आहेत. काल झालेल्या गारपिटीने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे.
 


राज्यात सध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. हिंगोली जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. या अवकाळी पावसामुळे हळद पिकासह फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: