Agriculture News in Bhandara : महावितरणने तयार केलेल्या कृषी वीज पुरवठा (Power supply) वेळापत्रकाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. कारण हा वीज पुरवठा रात्रीचा केला जात आहे. एकीकडं राज्यात कडाक्याची थंडी (cold Weather) सुरु आहे तर दुसरीकडं शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका आहे. अशा स्थितीत भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं मनस्ताप सहन करावा लागत आहे.


पीक जगवण्यासाठी रात्रभर शेतात पारा


भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात आहे. शेती जगवण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देत आहेत. एकीकडं राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शरीर गोठावणारी थंडी पडली आहे. तर दुसरीकडं वन्य प्राण्यांचा धोका आहे. अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात पहारा द्यावा लागत आहे.


रात्री 10 वाजल्यापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत वीज पुरवठा 


दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी रात्रीला वीज पुरवठा केला जात आहे. रात्री नऊ तर कधी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी साडेसहापर्यंत वीज पुरवठा दिला जात आहे. शेतात असलेल्या गहू आणि पालेभाजी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागावे लागत आहे. सध्या कडाक्याचा हिवाळा असून रात्री जिल्ह्यातील तापमानाचा पारा अधिक घसरत आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना काम कराव लागत आहे. तर दूसरीकडं रात्री शेत शिवरात फिरणारे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. अशा स्थितीत काही शेतकरी पीक जगवण्यासाठी एकत्र येत सामूहिक काम करत आहेत. दरम्यान, रात्री वीज रोहित्राचा फ्यूज गेला किंवा किरकोळ बिघाड आला तर तो व्यवस्थित करण्यासाठी कर्मचारी रात्रीला उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावी लागत आहे. हे काम नाही जमले तर  त्या दिवशी पिकांना पाणी देणं मुकलेच म्हणून समजा अशी स्थिती आहे.


दिवसा वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी 


शेतीसाठी आठ ते दहा तास वीज पुरवठा केला जातो, तो पण रात्रीचा केला जातो. सरकार आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. वाईट काळात जगाचा पोशिंदा जगाला जगवण्यासाठी धडपड करत आहे. अशा स्थितीत त्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याचे जगणे मान्य करावे. बळीराजाच्या संजीवनीसाठी सरकारने आणि महावितरणने दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणाची नवी योजना, एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्क्यांची सूट