Sunil Kedar : देशी गायीची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन 12 ते 15 लिटर होण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी व्यक्त केले. देशी गायींचा विस्तार करण्याबरोबरच संशोधनाची देखील गरज असल्याचे केदार म्हणाले. पुण्यातील शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीतर्फे देशी गोवंश प्रदर्शनाचे आयोजन केलं आहे. प्रदर्शनास सुनील केदार यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.


गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना जास्त माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 'गो-परिक्रमा' उपक्रमाद्वारे  देशी गायीच्या विविध जातीची माहिती मिळते. गाईंबाबत अधिक संशोधन करण्यासोबतच या संशोधित व वंशसुधारीत गायींचा प्रसार पशुपालकांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी सुनिल केदार यांनी व्यक्त केली. केदार यांनी प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही केले. त्यांनी विविध जातिवंत देशी गायींच्याबाबत माहिती यावेळी जाणून घेतली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग, कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, डॉ.धनंजय परकाळे, प्रकल्प प्रभारी सोमनाथ माने उपस्थित होते. 




27 तारखेपासून पुण्यात गोवंश प्रदर्शन सुरु झाले आहे. 29 मे म्हणजे आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरु आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे. यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे काम देखील केले जात आहे. 
 
संशोधनासंदर्भात माहिती मिळणार


दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही तेवढेच महत्त्वाचे आहे. गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.


महत्वाच्या बातम्या: