Agriculture News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस थंडीची लाट (Cold Wave) कायम राहणार असल्याने याचा परिणाम फळ पिकांवर होण्याची शक्यता आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. 


कमी तापमानामुळे फळ पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता
रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकं ही थंडीला अनुकूल असतात. तरीही तापमान कमी झालं तर काही पिकांवर याचा विपरित परिणाम होत असतो. कमी तापमानामुळे पपई (Papaya) तसंच केळी (Banana) पिकाची वाढ थांबणं, क्रॅकिंग होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे या काळात आपल्या फळ पिकांच्या बागांची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. पद्माकर कुंदे यांनी सांगितलं.


कशी काळजी घ्यावी? 
उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून थंडीची लाट आहे ती अजून काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पपई आणि केळीचा बागांची काळजी घेतली पाहिजे. 


1. केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावे. 


2. तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. 


3. अतिथंडी असेल तर बागांमध्ये शकोटी करावी त्याचा फायदा बागांना होतो. याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.


नंदुरबारमधील पारा घसरला
दरम्यान, राज्यभरातील तापमानाचा पारा घसरला आहे. नंदुरबारमध्ये सपाटी भागातील तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. तर सातपुड्याच्या डोंगररांगांमधील तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कमी होणाऱ्या तापमानाचा जसा परिणाम मानवी जीवनावर होत आहे तसाच परिणाम फळबागांवरही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.


आधी परतीचा पाऊस आता थंडीमुळे फळ पिकं अडचणीत
याआधी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं. या पावसाचा सर्वात मोठा फटका पपई तसंच केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. आता थंडीचा परिणाम देखील पपई पिकावर होण्याची शक्यता आहे.