Agriculture News : देशात शेती क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती क्षेत्रात प्रगती साधली जात आहे. तसेच सध्या शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं नवीन पिकांची लागवड करत आहेत. सध्या फळबागांच्या (Orchard) क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकारनं (Bihar Government) दिलासा दिला आहे. फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकार मोफत रोपे देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. 


देशातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यासह सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. बिहार सरकारनं देखील फळबागांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रोपे मोफत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळं शेतकरी खूश होणार आहेत.


 लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करु शकतात


अनुदान आणि मोफत रोपे मिळवण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करु शकतात. यामध्ये, निवड प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलंजाणार आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत कोण प्रथम अर्ज करेल. त्यालाच योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी कृषी विभागाच्या पोर्टलवर (horticulture.bihar.gov.in) ऑनलाइन अर्ज करू शकतात.


फळबाग लागवडीसाठी 50 टक्के अनुदान


फळबाग लागवडीसाठी बिहार सरकारनं 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन हप्त्यांमध्ये प्रती हेक्टर 50,000 रुपये देण्यात येतील. पहिल्या वर्षी, 60 टक्के निधी उपलब्ध होईल. तो 30,000 रुपयांपर्यंत असेल. एक हेक्टरमध्ये 400 रोपे लावण्यासाठी 29,000 रुपये खर्च येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाईल. दुसऱ्या वर्षी 10 हजार, तिसऱ्या वर्षीही केवळ 10 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या काळात झाडे निरोगी राहणे आवश्यक आहे. 


शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे


योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही कागदपत्रेही आवश्यक आहेत. अर्जासोबत शेतकऱ्यांना जमिनीचा उतारा, ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक आदी कागदपत्रे गरजेची आहेत. या कागदपत्रासह अर्ज भरावा लागणार आहे. या कागदपत्रांची पूर्तता झाली तरच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.


केळी उत्पादकांनाही दिलासा


बिहार सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. आता राज्य सरकार टिश्यू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे.