Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास लावला आहे. याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन आठ आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहोचली आहे. यामध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे.
एका स्लॅबच्या इमारतीत सुरु होता बोगस बियाणांचा कारखाना
शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या या बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर कृषी आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली आहे. मध्यरात्री झालेल्या या कारवाईत सुमारे दीड कोटी रुपयांचे बोगस बियाणे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी कोमल कांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) याला अटक करुन त्याच्या कृषी सेवा केंद्रातून बोगस कपाशी बियाणांची 74 पाकिटं जप्त केली आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातून मेहमूद गफ्फार चौहान याला अटक करण्यात आली आहे. वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील एका स्लॅबच्या इमारतीत सुरु असलेला बोगस बियाणे विक्री कारखाना सुरु होता.
आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे. विजय अरुण बोरकर असं आरोपी डॉक्टरच नाव आहे. हा जनावरांचा डॉक्टर असून गावागावांत जनावरांवर उपचार करण्यासाठी जाताना बोगस बियाण्यांची पाकिटं घेऊन जात, त्याची शेतकऱ्यांना विक्री करत होता. पोलिसांनी अटक करताच या डॉक्टरने बियाणे विक्री केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करत न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे.