Nanded APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील 147 बाजार समित्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड जिल्ह्यातही बाजार समित्यांच्या निवडणुकांची चुरस पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, नायगाव बाजार समिती बिनविरोध झाली आहे. त्यामुळं शिल्लक चार बाजार समित्यांमध्ये आज मतदान  होत आहे.


70 जागांसाठी नांदेड जिल्ह्यात 200 उमेदवार रिंगणात


कृषी उत्पन्न बाजार समितीतील 70 जागांसाठी नांदेड जिल्ह्यात 200 उमेदवार रिंगणात आहेत. सहा हजार 852 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट) या पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं आता मतदार कोणाच्या बाजूने कौल टाकतात, याकडे लक्ष लागले आहे. ग्रामीण सहकारातील अर्थकारणाची नाडी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आठ दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्यात पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील नायगाव बाजार समिती बिनविरोध झाली आहे. त्यामुळं चार बाजार समित्यांमध्ये निवडणूक होत आहे.


चारही बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी 18 जागा निवडून द्यावयाचा आहेत. नांदेड आणि कुंटूर येथे प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी अशा चार मतदारसंघातून उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात सोसायटी आणि ग्रामपंचायत हे दोन मतदारसंघ महत्त्वाचे मानले जातात. ज्या पक्षाच्या ताब्यात सोसायट्या आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती त्या पक्षाला बाजार समितीची निवडणूक सोपी जाते.


मतदानाला सुरुवात 


दरम्यान, सहकार विभागाने गुरुवारीच या निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. आज (28 एप्रिल) सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. मतदान केंद्रांची उभारणी निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी कामं पूर्ण झाली आहेत. त्यामुळं चारह बाजार समितीतील उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.


या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तीन पक्षांची राज्यात महाविकास आघाडी आहे. या आघाडीच्या ठिकठिकाणी वज्रमूठ सभा होत आहेत. या बाजारा समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याची संधी या पक्षांना प्राप्त झाली होती. पण नांदेड बाजार समिती वगळता इतर तीन बाजार समितीत ही आघाडी होऊ शकली नाही. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे 


महत्त्वाच्या बातम्या: 


Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला