सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी एका शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतल्याबद्दल अभिजीत पाटील यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. माढा मतदारसंघातील पडसाळी गावातील महेश पाटील यांनी एका एकरातील कांदा विक्रीतून 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं असून त्यांना अजून 3 एकरातील कांदा विक्रीतून 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे. महेश पाटील यांच्या यशाचं आमदार अभिजीत पाटील यांनी कौतुक करताना डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवलं, असं म्हटलंय.
आमदार अभिजीत पाटील यांची एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्ट जशीच्या तशी
माझ्या माढा मतदारसंघातील पडसाळीच्या शेतकऱ्याने काढले 1 एकरात 5 लाखाच्या कांद्याचे उत्पन्न!
डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..
कांदा अनेकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.. परंतू पडसाळी (ता. माढा) येथील शेतकरी श्री.महेश आण्णासाहेब पाटील यांनी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून ही किमया साधली आहे. शेतकऱ्याला यंदा कांद्याने लखपती केले आहे. योग्य व्यवस्थापन व नियोजन केल्याने शेती ही नक्कीच फायदेशीर ठरते हे या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. एकूण 4 एकरापैकी एका एकरात 5 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असून उर्वरित 3 एकरातून 15 लाख रूपये उत्पन्नाची आशा त्यांना आहे.
पडसाळी गावात त्यांची वडिलोपार्जित 6 एकर शेतजमीन आहे. यापैकी पाटील यांनी 4 एकरात पंचगंगा वाण असलेल्या कांद्याची लागवड केली. एका एकरातील काढणीत 50 किलोच्या 240 बॅग निघाल्या. त्यांनी बंगळुरु येथे स्वतःच जाऊन बाजारात कांदा विकला. त्यांना 5730 रूपये असा दर मिळाला. लागवड, खत, फवारणी, काढणी, वाहतूक यासाठी त्यांना 72 हजार रूपये खर्च आला. हा खर्च वजा जाता त्यांना 5 लाख 11 हजार रूपये निव्वळ नफा मिळाला आहे..
शेतकऱ्यांनी पाणी, खत व्यवस्थापन करुन बाजारभाव आणि मार्केटचा थोडाफार अंदाज घेऊन पीक घ्यावे. मेहनत आणि योग्य नियोजन करुन उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व गोष्टींचा विचार करावा. नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती फायद्याची ठरेल हे निश्चित..
अभिजीत पाटील यांची पोस्ट
इतर बातम्या :