Akola News : अकोला जिल्ह्यात आज कृषी केंद्र चालकांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळला आहे. जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. कांतप्पा खोत यांच्या बेलगाम काराभाराविरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे. कृषी अधिक्षक कृषी केंद्र चालकांची छळवणूक करत असल्याचा आरोप जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनांनी केला आहे. कृषी विभागात एसडीओ असणारे खोत तीन वर्षांपासून प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून अकोला जिल्हा कृषी अधिक्षक पदावर ठाण मांडून बसले आहेत.
अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघानं आपल्या निवेदनात जिल्हा कृषी अधीक्षकांवर विविध प्रकारचे आरोप करुन त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली होती. याबाबत संघटनेनं 8 जुलै रोजी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. यामध्ये 9 जुलैला जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांचा एकदिवसीय बंद ठेवण्याचा निर्धार केला होता. जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीचे निवेदन कृषी आयुक्तांना दिले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांनी जिल्ह्यात कृषी व्यावसायिकांमध्ये कारवाईबद्दल दहशत निर्माण केलेली आहे. कृषी व्यावसायिकांना भयमुक्त व्यवसाय करण्यासाठी त्यांची या जिल्ह्यातून बदली होणे आवश्यक आहे, अशी मागणी करत निवेदनासोबत चारशे व्यावसायिकांचे पत्र जोडल्याचे म्हटले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन सोनोने यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर तसेच अवजारे व गोडाऊन देण्यात आले. मात्र ती कागदोपत्री असून, ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडे अवजारेच नसून ती अवजारे कोठे गेली, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पेरण्या आणि मशागतीच्या कामांची लगबग सुरु आहे. परिणामी कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी आहे. अशात या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अद्यापी पावसानं हजेरी लावली नाही. ज्या ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, त्याठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आला आहे. खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशातच अकोला जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांनी एक दिवसाचा बंद पुराकरला आहे.
महत्वाच्या बातम्या: