vatmal sowing : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही दमदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. मागील आठ दिवसात यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी चार दिवसात सहा लाख हेक्टरवर लागवड केली आहे. त्यामुळं आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात 81 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
खरीप हंगामामध्ये एकूण 9 लाख 2 हजार हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलं होतं. त्याअनुषंगाने आतापर्यंत एकुण 7 लाख 27 हजार 163.40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात कापूस चार लाख 18 हजार हेक्टर, सोयाबीन दोन लाख 23 हजार हेक्टरवर, तूर 78 हेक्टर, ज्वारी- तीन हजार हेक्टर, मूग 1 हजार 575 हेक्टरवर, उडीद 1 हजार 598 हेक्टर, ऊस 1 हजार 597 हेक्टर, मका 103 हेक्टर, तीळ 54 तर बाजरी 5 हेक्टरवर आहे. एकूण सात लाख 27 हजार 163.40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. म्हणजे जवळपास 81 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 926.80 मिमी आहे. जून ते सप्टेंबर वार्षिक सरासरी 805 मीमी असून जिल्ह्यात 215.90 मिमी पाऊस पडलेला आहे. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत पावसाची टक्केवारी 26.82 टक्के तर सरासरीच्या तुलनेत 93.8 टक्के पाऊस झाला आहे. सद्य स्थितीत चांगला पाऊस झाल्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरु आहेत.
राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.
महत्वाच्या बातम्या: