Wheat Production : 2021-22 या पीक वर्षात गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) वर्तवला आहे. भारताचे गव्हाचे उत्पादन हे सुमारे 3 टक्क्यांनी घसरुन 106.84 दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 2021-22 या पीक वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन 315.72 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. पंजाब आणि हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याचा अंदाज आहे.
तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, ऊस या पिकांचे उत्पादन वाढण्याचा अंदाज
2021-22 पीक वर्षासाठी चौथा आगाऊ अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी (17 ऑगस्ट) जाहीर केला. यामध्ये तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, मोहरी, तेलबिया आणि ऊसासाठी देखील विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आहे. या पिकांचे विक्रमी उत्पादन हे सरकारच्या शेतकरी हिताचे धोरण तसेच शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शास्त्रज्ञांच्या परिश्रमाचे परिणाम असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. 2020-21 या पीक वर्षात, गहू, तांदूळ, कडधान्ये आणि भरड तृणधान्यांचा समावेश असलेले देशाचे अन्नधान्य उत्पादन 310.74 दशलक्ष टन विक्रमी होते. आकडेवारीनुसार, 2021-22 पीक वर्षात गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन इतके कमी आहे. जे मागील वर्षी 109.59 दशलक्ष टन होते. तसेच पीक वर्षात तांदूळ उत्पादन विक्रमी 130.29 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 124.37 दशलक्ष टन होते.
भरड धान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता
भरड धान्याचे उत्पादन 51.32 दशलक्ष टनांवरुन 50.90 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता कृषी मंत्रालयानं वर्तवली आहे. तर कडधान्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी कडधान्याचे उत्पादन हे विक्रमी 27.69 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी कडधान्याचे उत्पादन हे 25.46 दशलक्ष टन होते. 2021-22 पीक वर्षात तेलबियांचे उत्पादन हे विक्रमी 37.69 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी 35.94 दशलक्ष टन होते. 2021-22 पीक वर्षासाठी मोहरी बियाण्यांचे उत्पादन 17.74 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या: