भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC देशभरात कोट्यवधी ग्राहक असून त्यांच्यासाठी विविध गुंतवणूक योजना चालवण्यात येते. एलआयसी आपल्या योजनांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना देते. सध्या सोशल मीडियावर एलआयसीच्या KYC बाबत एक माहिती व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीनुसार, LIC विमाधारकाने KYC अपडेट न केल्यास त्याला दंड ठोठावण्यात येऊ शकतो. या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी तुम्ही वैयक्तिक माहिती शेअर केल्यास KYC अपडेट केली जाईल, असा दावा करण्यात येत आहे. एलआयसीने या व्हायरल होणाऱ्या मेसेजची दखल घेत ग्राहकांना सतर्क केले आहे. एलआयसीने म्हटले की, KYC अपडेट करण्याचा सल्ला विमाधारकांना दिला जातो. मात्र, KYC अपडेट न केल्यास दंडात्मक कारवाई केली जात नाही. विमाधारकांनी कोणतीही खासगी माहिती अनोळख्या व्यक्तीला देऊ नये असे आव्हान LIC ने केले आहे. अनोळख्या व्यक्तीला वैयक्तिक, खासगी माहिती दिल्यास फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.