लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला आज 29 वर्षे पूर्ण झाली.
30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपातील मृतांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले.
दर वर्षी आजच्या दिवशी हा कार्यक्रम पार पडत असतो.
पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडत भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांना अभिवादन करण्यात आले.
भूकंप झालेल्या गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज समाधान शिबिराचे देखील आयोजित करण्यात आलं होतं.
लातूर हे नाव जरी घेतले तर आज देखील 30 सप्टेंबर 1993 चा तो दिवस आठवतो.
29 वर्षापूर्वी याच दिवशी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले.
52 खेडेगावातील तीस हजाराच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या.
या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर सोळा हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले. पंधरा हजारा पेक्षा जास्त जणावरांचा मृत्यू झाला होता.
या भूकंपाचा फटका येथेच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला.