लग्नाला नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून पाहिले जाते. यानिमित्ताने लोक आठवणी जतन करण्याचा प्रयत्न करतात नववधूच्या फोटोशूटचा ट्रेंड म्हणजेच ब्राइडल फोटोशूट सध्या खूप लोकप्रिय होत आहे. गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या सुंदर अशा नववधूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये नववधू लाल साडीत एका खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर चिखलात फोटोशूट करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट होत आहे, त्या ठिकाणी वाहनांची वर्दळ दिसतेय. खड्ड्यांमध्ये भरलेल्या पाण्यामध्येही नववधू वेगवेगळ्या पद्धतीने फोटो क्लिक करत आहेत. हे ठिकाण केरळच्या मल्लपुरममधील पुकोट्टुमपदम येथील आहे. व्हायरल फोटोशूटमध्ये खड्डेमय रस्त्यावरून चाललेल्या केरळच्या नववधूला 4 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ही व्हिडीओ क्लिप एरो वेडिंग कंपनीने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या नववधूने हसत हसत खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावर फोटोशूट केले.