Yavatmal Girl Death : पाण्यासाठी गेला चिमुकलीचा जीव, एबीपी माझाच्या बातमीनंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ
Yavatmal Girl Death : पाण्यासाठी गेला चिमुकलीचा जीव, एबीपी माझाच्या बातमीनंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ
न्हाळ्यामुळे सर्वत्र पाणीबाणी (Water) असून विदर्भातील यवतमाळमध्ये (Yavatmal) पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या 12 वर्षीय वेदिकाच्या मृत्यूची दखल अनुसूचित जाती-जमाती आयोगाने (SC) घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल एबीपी माझाचे देखील आभार मानले. वेदिका चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी यवतमाळचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अमरावती विभागाच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्त या तिघांनी पुढील 7 दिवसात वेदिका चव्हाणच्या मृत्यू संदर्भात सविस्तर अहवाल आयोगापुढे सादर करावा, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले आहे आहेत.
वेदिका चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यूची आणि त्यासाठी पाण्याचा दुर्भिक्ष कारणीभूत असल्याचे सत्य एबीपी माझाने दाखवल्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाने घटनेची तत्काळ दखल घेत यवतमाळच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पुरवठ्याचं काम अर्धवट का होतं? हॅन्डपंप नादुरुस्त का होता? याचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती आयोगाचे उपाध्यक्ष एड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली. वेदिका चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी निश्चितच प्रशासन प्राथमिक दृष्ट्या दोषी दिसत आहे. मात्र, जोवर या संदर्भातला सविस्तर अहवाल अधिकाऱ्यांकडून मिळत नाही, तोवर अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. याप्रकरणी जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, त्यांना निलंबित करून घरी बसवले जाईल, असा इशाराही धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.