Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
गेल्या 10 दिवसांपूर्वी आलेल्या एका वृत्ताने सगळ्यांची झोप उडवली होती. कारण, रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पायधुनी परिसरातून समोर आली होती. त्यामुळे, या घटनेचं गुढ वाढलं होतं. मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचं खरं कारण शोधणं हे पोलीस आणि तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान होतं. याप्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये, मुंबईतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरटरीजचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. पायधुनीत एकाच कुटुंबातील मृत झालेल्या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात आणि घरातील कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईट सापडले आहे. कलिना एफएसएलमुळे तब्बल 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागला असून मृत्यूचं खरं कारण समोर आलं. मात्र, कलिंगडचं नाव समोर आल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आणि मुंबईतील विक्रेत्यांवर याचा मोठा परिणाम झाला होता. पण, कलिना एफएसएलने हे सत्य शोधलं आहे.