Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेत... त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलाय... कुठे ढोल-ताशांचा गजर... कुठे बँजो पथकाची आतषबाजी... तर कुठे डॉल्बीच्या आवाजासाठी प्रशासनाशी पंगा... पण या सगळ्यापेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळतंय सांगलीच्या गावभागात... इथे गणरायाच्या स्वागतासाठी ना डॉल्बीचा दणदणाट... ना बँजोचा गोंगाट... तर लेझीमचा ताल... टिपरीचा नाद... आणि परंपरेचा जल्लोष.. विशेष म्हणजे या तालावर थिरकतेय एक-दोन नव्हे... तर तीन पिढ्यांची पावलं.. चला तर पाहुया, गणरायाच्या स्वागतासाठी रंगलेला हा अनोखा सराव...
गणेशोत्सव म्हटलं की उत्साह, जल्लोष आलाच... कुठे ढोल-ताशांचा दणदणाट... कुठे बँजोचा आवाज... तर कुठे डॉल्बीच्या मुद्द्यावरून प्रशासनाशी वाद.. पण या सगळ्या गोंगाटापासून दूर, सांगलीच्या गावभागात गणरायाच्या स्वागतासाठी एक वेगळीच तयारी सुरू आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लेझीम खेळाची परंपरा, कला आणि वारसा, पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, विसावा गणेश मंडळाकडून सुरूय...
गणरायाच्या आगमनाच्या काही दिवस आधीपासूनच सरावाला सुरुवात होते.. आणि या सरावाचं वैशिष्ट्य म्हणजे, वयाची अट नाही...
वयाची साठी ओलांडली तरी उत्साह तरुणांनाही लाजवेल असा.. वय वाढलं, पण गणरायाच्या आगमनासाठीचा उत्साह कधीच कमी झाला नाही.. ज्येष्ठांच्या या उत्साहाला
तरुणाईचीही तितकीच दमदार साथ...
तरुण-तरुणीही चपळाईने लेझीम खेळत या सरावात रंगत आणत आहेत. एका बाजूला ज्येष्ठांचा अनुभव... तर दुसऱ्या बाजूला तरुणाईचा जोश... आणि या दोघांचा सुंदर संगम पाहायला मिळतोय तो गणरायाच्या स्वागताच्या या पारंपरिक सरावात
गणरायाच्या आगमनाचा उत्साह.. लेझीमचा ताल.. टिपरीचा नाद.. आणि आपल्या संस्कृतीची ओढ.. यामुळे विसावा गणेश मंडळाची ही तयारी आणखीनच खास ठरतेय... कारण उत्सव मोठा करण्यासाठी आवाज मोठा असण्याची गरज नसते.. मनात भक्ती असेल, आणि परंपरेची साथ असेल तर, उत्सव आपोआपच मोठा होतो..