Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
PM Modi and Amit Thackeray: पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. याठिकाणी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्टस कोट्यातली खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अमित साहेब पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेटी देऊन gen z विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या,अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित विविध अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थीनी सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर सर्रासपणे होणाऱ्या सिगारेट व गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी, तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.