Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Vinayak Raut on Girija Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच (Domestic Violence) 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' (Anti-Superstition Act) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. 2017 ते 2018 पर्यंत गितेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच गितेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी सासरच्यांनी अघोरी कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, गिरीजा राऊतांचे हे सगळे आरोप विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत फेटाळून लावले आहेत.
Vinayak Raut on Girija Raut: मागील महिन्यातच सुरक्षा काढली, यामागे मोठे राजकीय षडयंत्र
आपली पार्श्वभूमी राजकीय आहे आणि आपण राजकारणात सक्रिय आहात, याच पार्श्वभूमीवर आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले जात आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता विनायक राऊत यांनी यामागे राजकीय हात असल्याचा थेट संशय व्यक्त केला. "मी आज आपल्या समोर तो पुरावा उघड करणार नाही, पण यात जे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे मी काही दिवसांनी नक्कीच सांगेल. पण गेल्या महिन्यातच आमचे प्रोटेक्शन पूर्णपणे काढून टाकण्यात आले. आम्ही मागणी केली तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिला. त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामधून आम्ही नक्कीच सहीसलामत बाहेर पडू," असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.