Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या (NCP Merger) चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय.
राज्यसभेच्या जागांबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार करता तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. कारण तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले.
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार
तसेच शरद पवार यांच्या भूमिकेबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, "माझी मध्यंतरी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयांच्या संदर्भात मी त्यांचं मत विचारलं. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. मग आता यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला देखील सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.























