Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Narhari Zirwal: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Narhari Zirwal: ‘घटना चुकीची, पाठिशी घालणार नाही’
झिरवाळ सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसीबीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना झिरवाळ म्हणाले, “मी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जी घटना घडली, ती अत्यंत चुकीची आहे आणि असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठिशी घातले जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
Narhari Zirwal: सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे चुकीचेच
सदर कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास माहिती होता का, या प्रश्नावर उत्तर देताना झिरवाळ म्हणाले, “माझ्यासमोर या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वी कोणतीही तक्रार आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले असतील, तर त्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला भोगावीच लागेल,” असे त्यांनी म्हटले.
























